- प्राचीन महाराष्ट्र :
महाराष्ट्र हे भारतातील एक पुरोगामी, प्रगत व समृद्ध,सांस्कृतिक वारसा लाभलेले
राज्य आहे.मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे .सध्याचा गुजरात व महाराष्ट्र
राज्याचे मिळून १ नोव्हेंबर १९५६ रोजी दुवैभाषिक मुंबई राज्य
स्थापन झाले.त्यानंतर मध्य प्रांतातून विदर्भ व हैदराबाद राज्यातून मराठवाडा मुंबई
राज्याला जोडून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे
स्थान १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर अक्षांश व ७२.६६ पूर्व ते ८०.९
पूर्व रेखांशांच्यादरम्यान आहे.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३
चौकिमी.असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान व मध्य
प्रदेशानंतर देशात तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची
पूर्व-पश्चिम लांबी ८०० कि.मी व उत्तर दक्षिण ७०० कि.मी असून महाराष्ट्रात
सध्या एकूण ३६ जिल्हे व ३५८ तालुके आहे.महाराष्ट्राला एकूण ७२० किमी लांबीची किनारपट्टी
लाभली आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्राची पुढील सहा प्रशासकीय विभागात
विभागणी केली आहे.कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद , अमरावती व नागपूर . २०११ च्या
जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ इतकी
आहे.
महाराष्ट्र शब्दाचा अर्थ
व व्युत्पत्ती :-
महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा उदय नेमका कधी झाला याबाबत
विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. देश, राष्ट्र या
संज्ञा आजकाल राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून वापरल्या जातात. परंतु पूर्वीच्या
काळी गणराज्ये होती. प्राचीन काळी ‘आर्यावर्त
आणि ‘दक्षिणपथ' असे भारताचे दोन विभाग होते.
उत्तरेत ‘आर्य व दक्षिणेत ‘द्रविड' लोक राहत असत. विंध्य पर्वताच्या दक्षिणेच्या प्रदेशाला ‘दक्षिणपथ' म्हटले जाई. यामध्ये कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, आनर्त, अपरांत, कुंतल वं देवराष्ट्र इत्यादी भूभागांचा उल्लेख आढळतो. सर्वप्रथम कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र' या ग्रंथामध्ये अश्मक व अपरांत येथील पावसाच्या प्रमाणाचा
उल्लेख आहे. इ. स. पू. तिस-या शतकात सम्राट अशोकाच्या काळात महारठ्ठ' प्रदेशात धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी
पाठवल्याचा उल्लेख शिलालेखातुन प्राप्त होतो. इ. स. पू. दुस-या शतकातील
सातवाहनांच्या नाणेघाटातील लेखात महारठ्ठ असा उल्लेख आढळतो. इ. स. ३६५ च्या मध्य
प्रदेशातील ‘फेरण' स्तंभालेखात राजा श्रीधर
वर्माचा सेनापती ‘सत्यनाग हा स्वत:ला महाराष्ट्री म्हणवतो. चालुक्य राजा
दुसरा पुलकेशी याच्या ऐहोळ प्रशस्तीमध्ये रविकीर्ती याने महाराष्ट्राचा उल्लेख
केल्याचे आढळते.
डॉ. भांडारकरांनी असे मत मांडले आहे की, ‘रठ्ठ' या शब्दाचेच संस्कृत रूप
राष्ट्रीक असून ‘भोज' स्वत:ला महाभोज म्हणत असत. तसेच
राष्ट्रीक' आपणास महाराष्ट्रीक म्हणत असत. महाराष्ट्र हे नाव कुठल्याही जातीवरून व वंशावरून पडले नसून ते
प्रदेशाच्या विस्तारावरून पडले, असे मत पा. वा. काणे यांनी
मांडले आहे.
साधारणपणे इतिहासाची विभागणी प्रागैतिहास, इतिहासपूर्व व ऐतिहासिक कालखंड अशा तीन भागात केली जाते.
- प्रागैतिहास - ज्या काळात मानवास लिपी अवगत नव्हती व मानवी जीवन हे रानटी व भटक्या स्वरूपाचे होते. या कालखंडाला प्रागैतिहास असे म्हणतात. यानुसार अश्मयुगाचा समावेश प्रागैतिहास काळात केला जातो
- इतिहासपूर्व - ज्या काळातील मानवाचे जीवन प्रागैतिहासिक मानवापेक्षा प्रगत होते व या मानवाला लिपी अवगत होती; परंतु ती अस्पष्ट किंवा गूढ असल्याने तिचे वाचन करता आले नाही. या कालखंडाला इतिहास पूर्व काळ असे म्हणतात. सिंधू संस्कृतीची गणना इतिहास पूर्वकाळात केली जाते.
- ऐतिहासिक कालखंड - ज्या काळात मानवाचे जीवन सुसंस्कृत बनले व ज्या काळात लिखित ऐतिहासिक पुरावे प्राप्त होतात, त्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात. यानुसार इ. स. पू. ६ व्या शतकापासूनच्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे मानले जाते.
मानवाच्या भौतिक विकासामध्ये अश्म म्हणजेच दगडाचे खूप महत्त्व
आहे. प्रारंभी मानवाने दगडाचा उपयोग करून अन्न संग्रहित केले, दगडाचा उपयोग करून निवारा बनवला, दगडावरच कलेचे आविष्कार केले व अग्नीची ही
उत्पत्ती दगडाद्वारेच केली. प्रारंभिक मानवाने आपली अवजारे, हत्यारे व निवारा यासाठी दगडांचा वापर केल्याने या कालखंडाला ‘अश्मयुग' असे म्हणतात.
भारतामध्ये इ. स. १८६३ मध्ये रॉबर्ट ब्रुस फुट या भूतत्त्व
विद्वानाला मद्रास जवळील पल्लवरम येथे सर्वप्रथम पुराश्मयुगीन पाषाणोपकरण
मिळाल्यावरच अश्मयुगीन काळातही भारतात लोकवस्ती असल्याचे निश्चित झाले.
अश्मयुगीन हत्यारे व साधने |
महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्खननाद्वारे सापडलेल्या हत्यारांच्या आधारे अश्मयुगाची तीन कालखंडात विभागणी केली जाते.
- १ पुराश्मयुग (इ. स. पू. ३ लाख ते इ. स. पू. ८०००)
- २ मध्याश्मयुग (इ. स. पू. ८००० ते इ. स. पू. ४०००)
- ३ नवाश्मयुग (इ. स. पू. ४००० ते इ. स. पू. १०००)
पुराश्मयुग (Palaeolithic Age) :
पुराश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :-
१)पुराश्मयुगीन मानवी जीवन हे भटक्या स्वरूपाचे होते.२)या काळातील मानव उन, थंडी, पाऊस, हिंस्र राणी इ.पासून संरक्षणासाठी नैसर्गिक गुहा व मोठ्या शिळांचा आश्रय घेत असे. ३) या काळातील मानव कच्चे मांस व कंदमुळे खात असे. ४) पुराश्मयुगीन मानव झाडांच्या साली व प्राण्यांच्या कातड्यांनी आपले शरीर झाकत असे. ५)या काळातील मानवाचे शारीरिक अवशेष उत्खननातून मिळाले नाहीत.६)पुराश्मयुगीन मानव शिकारीसाठी ओबडधोबड व आकाराने मोठ्या दगडांचा वापर करत असे. ७)या काळातील हत्यारे बेसाल्ट व डोलेराईट या खडकापासून बनवलेली असत. नंदूरबार जिल्ह्यातील कुंभारपाडा व उमरज, धुळे जिल्ह्यातील भाडणे, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथून पुराश्मयुगीन अवशेष प्राप्त होतात.८) उत्खननात सापडलेल्या हत्यारांमध्ये हातकु-हाडी, तासण्या, वेधण्या यांचा समावेश होतो.
मध्याश्मयुग (Mesolithic Age) :
मध्याश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :-
७) या काळातील हत्यारे ही ज़स्पर, चर्ट, एगट अशा दगडांची बनवली जाऊ लागली. ८)शिकारीसाठी व संरक्षणाच्या सामूहिक भावनेतून हा मानव टोळी करून राहू लागला. ९)गाय, बैल, म्हैस, घोडा, शेळी, मेंढी यांची या काळात शिकार केली जाई. १०)पुरलेल्या मृताजवळ सापडलेल्या दैनंदिन वापरातील भांडी व हत्यारांवरून त्या काळातील मानवाचा मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याचे दिसून येते.११)नेवासे, नांदेड, जळगाव व गोदावरी नदीच्या खो-यात या काळातील हत्यारे सापडली आहेत.
नवाश्मयुग (Neolithic Age) :
नवाश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :-
कार्बन १४ पद्धती :
पुरातत्त्वीय पुराव्यांचे कालमापन करण्यासाठी या पद्धतीचा
वापर केला जातो. ही पद्धत एफ. डब्ल्यू. लिबी यांनी १९४९ साली शोधून काढली व १९६०
साली परिपूर्ण केली. या कामाबद्दल त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक
देण्यात आले.
प्रत्येक सजीव (मानव, वनस्पती, प्राणी) जिवंत असेपर्यंत कार्बन-डायऑक्साईडद्वारे कार्बन १४
शरीरात घेत असतो. सर्व सजीवांमध्ये सी-१४ चे प्रमाण एकच असते व मृत्यूनंतर सर्व
सजीवांच्या अवशेषातून सी-१४ एकाच प्रमाणात बाहेर पडते. जिवंतपणी असलेल्या सी-१४ चा
अर्धा भाग मृत्यूनंतर ५५६८ वर्षांनंतर नाहीसा होतो. या कालावधीला सी-१४ चे अर्धे
आयुष्य म्हणतात.
या पद्धतीनुसार आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सर्जनाशी
मृत प्राण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला
हे ठरवता येते.
सिंधू संस्कृती (इ.स.पू. २५००- इ.स.पू. १७००) :
सुमारे ५००० वर्षांपूर्वी जगातील प्रमुख चार नद्यांच्या
काठी मानवी संस्कृती निर्माण झाल्या. यामध्ये तैग्रीस आणि युफ्रेटिस नक्ष्यांच्या
काठी मेसोपोटेमिया संस्कृती, नाईल नदीकाठी इजिप्तची
संस्कृती, सिंधू नदीच्या काठी सिंधू संस्कृती आणि हो-हँग-हो नदीच्या
काठी चिनी संस्कृतीचा उदय झाला. नद्यांच्या किनाच्याजवळील गाळाची व सुपीक मृदा, शेतीस योग्य वातावरण व पाण्याचा उपयोग करून मानवाने शेतीतून
अन्नोत्पादने वाढवली. अन्नधान्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढल्याने काही मानवांनी
शेती कार्यास पूरक व्यवसाय, घरांची निर्मिती, धातू उद्योग
अशा प्रकारचे कार्य करण्यास सुरुवात केली. या वस्तूंच्या देवाण-घेवाणीसाठी ग्रामीण
समुदायात राहणारा मनुष्य मोठ्या संख्येने एकत्र येऊन राहू लागला व यातूनच नागरी
संस्कृतीची निर्मिती झाली.
सिंधू संस्कृतीचा शोध : - सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख चाल्र्स मेसन यांनी १८२६
मध्ये केला; परंतु सिंधू संस्कृतीची खरी ओळख १९२०-२१ साली लाहोर-मुलतान
रेल्वेसाठी खोदकाम करताना सापडलेल्या विटा, मुद्रा व
इतर पुरातत्त्वीय अवशेषांमुळेच झाली. जॉन मार्शल, राखालदास
बॅनर्जी, दयाराम सहानी, माधव स्वरूप
वत्स इ. पुरातत्त्व विद्वानांच्या परिश्रमपूर्वक उत्खननामुळे एका अतिप्राचीन
संस्कृतीचा शोध लागला. दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये या संस्कृतीतील ‘हडप्पा' शहराचा उत्खननातून शोध लावला.
हडप्पा' हे शहर सिंधू संस्कृतीमधील सर्वप्रथम उत्खननीत स्थळ
असल्याने व सिंधू संस्कृतीच्या इतर उत्खननित शहरातील सर्वच लक्षणे या शहरात आढळत
असल्याने सिंधू संस्कृतीलाच 'हडप्पा संस्कृती' असे ही म्हणतात.
स्थान-विस्तार : - पूर्वेस आलमगीरपूर, पश्चिमेस
सुत्केगेंडोर, दक्षिणेस महाराष्ट्रातील दायमाबाद व उत्तरेस जम्मूमधील
मांडा अशा याच्या सीमा आहेत. पूर्व पश्चिम १६०० किमी व दक्षिण उत्तर ११०० किमी याची
लांबी, रुंदी असून एकूण १२,९९,६०० चौकिमी
भारताचा भाग याने व्यापला आहे. पंजाब, राजस्थान, गुजरात, बलुचिस्तान, हरियाणा व महाराष्ट्र इत्यादी प्रदेशात या संस्कृतीचा
विस्तार झाला आहे.
सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये : - हडप्पा, मोहनजोदडो, रंगपूर, सुरकोटडा, कालीबंगन, रोपड, दायमाबाद, मेहरगढ, चहूदंडो, ढोलवीरा अशा ४०० हून अधिक
ठिकाणच्या उत्खननित अवशेषांवरून सिंधू संस्कृतीची पुढील काही वैशिष्ट्ये दिसून
येतात.
१) सिंधू संस्कृती ही कास्ययुगीन संस्कृती आहे.
१) सिंधू संस्कृती ही कास्ययुगीन संस्कृती आहे.
२) ही एक नागरी व व्यापार प्रधान संस्कृती आहे.
३) सिंधु संस्कृतीमध्ये सामाजिक व धार्मिक वैमनस्यांचा अभाव आहे.
४) अन्य संस्कृतीशी सिंधू संस्कृतीचे व्यापारीक संबंध
४) अन्य संस्कृतीशी सिंधू संस्कृतीचे व्यापारीक संबंध
असल्याचे उत्खननीत पुराव्यांवरून समजते.
५) सिंधू संस्कृतीमधील लोकांना लिपीचे ज्ञान होते.
६) सिंधू संस्कृती ही एक शांतताप्रिय संस्कृती होती.
७) सिंधू संस्कृतीमध्ये मंदिरांचा अभाव दिसून येतो.
८) सिंधू संस्कृतीमधील वजनमापात समानता दिसून येते.
९) सिंधू संस्कृतीच्या सर्व नगरांना तटबंदी होती. .
१०) सिंधू संस्कृतीमध्ये नगर नियोजनास महत्त्व होते.
सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे : - सिंधू संस्कृतीच्या -हासांच्या
कारणाबाबत इतिहासकारांनी विविध मते नोंदवली आहेत. काही इतिहासकारांच्या मते, हवामानातील बदल, सिंधू
नदीच्या प्रवाहाच्या दिशेत बदल, सततचा दुष्काळ यामुळे लोकांनी
स्थलांतर केले असावे. त्यामुळे या संस्कृतीचा -हास झाला असावा. तसेच काही इतिहास
संशोधकांनी आर्यांच्या आक्रमणामुळे, व्यापारातील
मंदीमुळे व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही संस्कृती नष्ट झाली असावी, असे मत नोंदवले आहे. सुमारे इ. स. पू. १७५० च्या दरम्यान
सिंधू संस्कृतीचा -हास झाला असावा.
ताम्रपाषाण युग (Chalcolithic Age)
सिंधू संस्कृतीच्या उत्तर काळात महाराष्ट्रातील काही भागात तांब्याचा वापर करून कृषीप्रधान संस्कृती निर्माण झाल्या.
या काळातील अवजारे व हत्यारे ही ताम्र (तांबे) व पाषाणांच्या संयुक्त
वापराने बनवलेली असल्याने या कालखंडाला ‘ताम्रपाषाण
युग' असे म्हणतात.
महाराष्ट्रातील ताम्रपाषाण स्थळे व कालखंड : - प्रकाशे, नेवासे, चांदोली, सोनगाव, टेक्वाडे, सावळदे, दायमाबाद, बहाळ अशा महाराष्ट्रातील अनेक
ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष प्राप्त झाले आहेत व याचा कालखंड सुमारे इ. स.
पू. २२०० ते इ. स. पू. १००० असा मानण्यात येतो.
पुरातत्त्व विद्वानांनी उत्खननीत ताम्रपाषाण युगीन स्थळांचे
सावळदा संस्कृती, उत्तर सिंधू, दायमाबाद, माळवा व जोर्वे संस्कृती असे विभाजन केले आहे.
ताम्रपाषाण युगाची वैशिष्ठ्ये : -
१) गृहरचना - ताम्रपाषाण संस्कृतीच्या लोकांची गृहरचना उत्कृष्ट व योजनाबद्ध होती. ही घरे आयताकृती तसेच गोलाकार असत.यातील आयताकृती घरे कुडाच्या भिंतींची असते. तर गोलाकार घरे झोपड्यांसारखी असत.घरासाठी भाजलेल्या विटांचा वापर केला जाई.
२) उत्खननीत
भांड्यामध्ये गोलाकार भांडी, वाडगे, लोटा, उथळ तळाची भांडी मिळतात.
त्यावर हरिण, मोर, चित्ता, बैल, पक्षी इत्यादींची चित्रे काढलेली आढळतात.
३) हत्यारे - ताम्रपाषाण युगीन लोकांनी दगड व हाडांच्या बरोबरच हत्यारे व
अलंकार बनवण्यासाठी तांब्याच्या धातूचा वापर करण्याचे तंत्र विकसित केले.
चालकोपायराईटचा उपयोग तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी करत असत. तांब्यापासून
कुन्हाडीचे पाते, टोकदार हत्यारे, चाकू, बाण, भाल्याचे टोक बनवत असत.
४) कृषी जीवन - ताम्र व पाषाण यांच्या संयुक्तिक वापराने शेतीसाठी उपयुक्त
अवजारांची निर्मिती केल्याचे दिसते. ताम्रपाषाण संस्कृतीतील हे लोक शेती करू लागल्याने
त्यांच्या स्थायी स्वरूपाच्या वास्तव्यातून खेडी निर्माण झाली व यातूनच ग्रामीण
महाराष्ट्राचा प्रारंभ झाला. या काळात गहू, तांदूळ, मसूर, मूग, उडीद, बाजरी इ. धान्ये पिकवली जात.
तर गाय, बैल, म्हैस इ. प्राणी पाळले जात. उत्खननातून सापडलेल्या मासे
पकडण्याच्या गळावरून मासेमारीचा व्यवसाय या काळात मोठ्या
प्रमाणात असल्याचे दिसते.
५) समाजजीवन व धार्मिक संकल्पना - या काळातील मानव हा शाकाहार व मांसाहारांचा
अन्नामध्ये समावेश करत. कंदमुळे व फळे याबरोबरच दुधाचाही आहारात समावेश करत.
मनोरंजनासाठी सामूदायिक शिकार, प्राण्यांच्या झुंजी हे खेळ
प्रचलित होते. उत्खननातून प्राप्त मातृदेवीच्या मूर्तीवरून हे मातृपूजा व प्राणी
पूजा करत असावेत.
६) अलंकार - ताम्रपाषाण
युगीन मानव शंख-शिंपल्यांच्या बांगड्या, तांबे
धातूपासून बनवलेली आभूषणे, दगडी मणी व हस्तिदंताचीही सौंदर्य प्रसाधनांसाठी वापर करत
असत. बांगड्या, अंगठ्या, कर्णफूले इ. अलंकारांचा हे लोक
वापर करत असत.
७) दफन पद्धती- ताम्रपाषाण युगीन लोकांचा मरणोत्तर जीवनावर विश्वास
असल्याचे उत्खननात, मृत अवशेषांच्या पुराव्यांवरून दिसून येते. मृतदेह
पुरण्यासाठी दफनकुंभ व शवपेटीचा वापर करत. मृताच्या दैनंदिन वापरातील वस्तू
मृतासोबतच पुरल्याचे दिसून येते.
महापाषाणयुगीन संस्कृती (Megalithic Age) :
'Megas'
म्हणजे मोठा व 'litho' म्हणजे दगड या दोन शब्दांपासून Megalith म्हणजेच मोठा दगड हा शब्द बनला आहे.
मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन व आवडीच्या वस्तू त्यासोबतच पुरल्या जात व याजागी
त्याची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढीग विशिष्ट पद्धतीने ठेवला जाई.
दफनासाठी वापरलेल्या या पाषाणाच्या विशिष्ट पद्धतीमुळे या कालखंडाला ‘महापाषाण युग असे म्हणतात. महाराष्ट्रातील
महापाषाण युगाचा काळ हा इ. स. पू. १००० वर्षांपूर्वीचा आहे. ही एक लोहयुगीन
संस्कृती आहे. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील रंजाळा, जळगाव जिल्ह्यातील बहाळ, टेकवाड़े तसेच नागपूर जिल्ह्यातील माहरझरी इ.
ठिकाणी याचे अवशेष प्राप्त होतात.
महाराष्ट्रातून प्राप्त महापाषाण उत्खननाद्वारे या काळाची
पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात.
- १) या काळातील मृत अवशेष शिलावर्तुळात, खड्ड्यात व शवपेटीत ठेवल्याचे अनेक सांगाडे उत्खननातून प्राप्त होतात.
- २) मृताबरोबर लोखंडी भाले, तलवारी, कट्यारे, कु-हाडी अशा हत्यारांचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
- ३) गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, तांदूळ यांचे उत्पादन या काळात घेतले जाई.
- ४) कुत्रा, बैल, घोडा, गाय, हरिण, रानडुक्कर, बकरा इ. प्राण्यांचा मांसाहारासाठी वापर केला जाई.
- ५) या काळातील मानव मातीच्या घरात, कच्च्या विटा व कुडांनी बांधलेल्या घरात राहात असत.
- ६) या काळातील मानव सोने, चांदी, ब्राँझ धातूपासून बनवलेले अलंकार वापरत असत.
- ७) विदर्भातील नैकुंड येथे लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे. यावरून धातू व्यवसाय हा या काळात मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे संकेत प्राप्त होतात.
- ८) या काळातील मानवांनी शेतीबरोबरच पशूपालनासही महत्त्वदिले होते.कुंभाराच्या चाकावर मृदभांडी बनवणे, त्यावर चित्रकला, नक्षीकाम व भाजून पक्के बनवणे यामध्ये ते कुशल असल्याचेपुरावे मिळतात.
- ९) काच, दगडी मणी, नीलमणी यांचाही वापर अलंकार म्हणून करत असत.
- प्रस्तावना
मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात गुंग आणि
कण्वांचे वर्चस्व निर्माण झाले. याचवेळी महाराष्ट्रात सातवाहन घराण्याचा उगम झाला.
सातवाहनांनी राजकीय स्थैर्य, उत्कृष्ट प्रशासन, धार्मिक सहिष्णुता व व्यापारास चालना दिल्याने सुस्थिर शासन
निर्माण केले. त्यामूळे कला, स्थापत्य व साहित्यामध्येही
भरभराट झाली.
सातवाहनाच्या ३० राजांनी इ. स. पू. २३० ते इ. स. २३० असे
एकूण ४६० वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम
दर्शवणारे व महत्त्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच पहिले महाराष्ट्रातील
राजघराणे होय. .
सातवाहनांचे मूळ स्थान व कालखंड : - सातवाहनांच्या
मूळ स्थानाविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही. काही इतिहासकारांच्या मते ते मूळचे
आंध्रप्रदेशचे आहेत. तर डॉ. मिराशीच्या मताप्रमाणे सातवाहनांचा मूळ प्रदेश विदर्भ
होय. उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून सातवाहनांचे मूळ स्थान महाराष्ट्र असून पैठण
(प्रतिष्ठान) ही त्यांची राजधानी होय.
सातवाहनांच्या इतिहासाची साधने : - सातवाहन कालखंडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी कोल्हापूर, पैठण, क-हाड, नाशिक, भोकरदन येथील पुरातत्वीय
उत्खननांचा उपयोग होतो. तसेच उत्खननातून सापडलेल्या नाण्यांद्वारेही यांचा इतिहास
समजण्यास मदत होते. याचप्रमाणे कालें, भाजे, बेडसे, पितळखोरे, अजंठा, कान्हेरी येथील लेणी, चैत्य, स्तुप, विहार व शिलालेख इ. च्या अवशेषांद्वारेही सातवाहनांच्या
इतिहासावर प्रकाश पडतो. गुणाढ्याची ‘बृहत्कथा', राजा हाल याचा गाथा सप्तशती' इ.
साहित्यातून व परकीय प्रवाशांच्या प्रवासवर्णनावरून सातवाहनांची माहिती मिळते.
१) सिमुक : - सिमुक हा सातवाहन राजवंशाचा संस्थापक होय. राजा
सिमुकने शेवटचा कण्व राजा सुशर्मा याला ठार केले आणि आपली
सत्ता प्रस्थापित केली. याने ‘विदर्भ आणि ‘विदिशा जिंकून घेतले व स्वत:ला ‘दक्षिणपथपती' असे बिरुद
धारण केले.
२) सातकर्णी
प्रथम : - राजा सिमुक नंतर त्याचा लहान भाऊ ‘कृष्ण' गादीवर आला. त्याने नाशिक
जिंकून घेतले व १८ वर्षे राज्य केले. राजा कृष्णच्या नंतर सिमुकचा मुलगा सातकर्णी
याला राज्य मिळाले. सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा
जुन्नरच्या (नाणेघाट) प्रतिमा मालिकेत कोरल्याचे पुरावे मिळतात. हा पराक्रमी व
मुत्सद्दी राजा होता. याने कलिंग नरेश खारवेलचा पराभव केला. हा वैदिक धर्माचा
कट्टर पुरस्कर्ता होता. त्याने आपल्या हयातीत दोन अश्वमेध यज्ञ व एक राजसूय यज्ञ
केल्याचे पुरावे आहेत. प्रथम सातकर्णीच्या शौर्यामुळे या राजवंशातील सर्व राजे
आपल्या नावासमोर सातवाहन असा शब्दप्रयोग न करता सातकर्णी असाच करू लागले. यानंतर
सुमारे एक शतक सातवाहनांच्या वाढत्या सत्तेला व सामथ्र्याला पायबंद बसला.
सातकर्णीनंतर शकांच्या आक्रमणापुढे सातवाहनांचे राज्य दुर्बल बनले.
३) राजा हाल :- या सातवाहन
राजाबद्दल फक्त वाङ्मयीन साधनांच्या आधारे माहिती मिळते. याने प्राकृत भाषेला
राजाश्रय देऊन गाथा सप्तशती' हा प्राकृत काव्य संग्रह
रचल्याची माहिती मिळते.
४) गौतमीपुत्र
सातकर्णी : - गौतमीपुत्र सातकर्णीन सातवाहन सत्तेचे पुनरुज्जीवन केले.
माळव्यापासून दक्षिणेकडील नाशिक प्रशस्तीमध्ये आपल्या मुलाचे वर्णन करताना ‘त्रिसमुद्रतोयपितवाहन' म्हणजेच
ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहेत असे गौरवपर उद्गार गौतमी बलश्री
हिने काढले आहेत. कानडी मुलखापर्यंत त्याचे साम्राज्य पसरले होते. याने शक पल्लव, यवन यांचा पराभव केला व क्षत्रप राजा नहपानच पराभव करून
सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली व दरारा निर्माण केला. आईबद्दल असलेल्या आदरामुळे
त्याने स्वत:च्या नावापूर्वी आईचा आवर्जून उल्लेख केलेला दिसतो.
५) यज्ञश्री सातकर्णी : - हा सातवाहन
घराण्यातील शेवटचा मोठा राजा होय. शकांनी यापूर्वी जिंकून घेतलेला प्रदेश त्याने
परत जिंकून घेऊन आपले साम्राज्य वाढवले. जहाजाचे चित्र असलेल्या त्याच्या काही नाण्यांवरून त्यांचे आरमार व
व्यापाराविषयी माहिती मिळते.
शकांची आक्रमणे, सततची
युद्धे, विशाल साम्राज्य, दुर्बल
वारसदार या कारणांमुळे सातवाहन सत्तेचा -हास झाला.
१) शेती :- सातवाहनांचा काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासात आर्थिक
समृद्धीचा होता. या काळात शेती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. उत्पादनाचा १/१०
भाग भूमीकर म्हणून शेतकरी राजाला देत. शेतीस पाणी पुरवठा करण्यासाठी तलाव, कालवे व विहिरी खोदल्या जात. “बृहतसंहिता'मध्ये खरीप
व रब्बी पिकांचा उल्लेख केला आहे. शेती बरोबरच दूध व मांस यासाठी पशुपालन हा
व्यवसाय केला जाई. गाय, बैल, घोडा, गाढव, खेचर, बकरी, मेंढी, कुत्रा, हत्ती, उंट हे प्राणी पाळले जात असत.
२) उदयोगधंदे - वस्त्रोद्योग
हा या काळातील महत्त्वाचा उद्योग होय. साधे, तलम, मलमली रेशमी असे वस्त्रांचे उत्पादन या काळात घेतले जाई.
सोने, चांदी, पितळ, लोखंड, तांबे या धातूंचा दागिने, मूर्ती, कृषी अवजारे, घरगुती
वस्तू बनवण्यासाठी वापर केला जाई. सातवाहन राजांच्या प्रोत्साहनामुळे परकीय
व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत होता व यामुळे भडोच, सोपारा ही
बंदरे व पैठण, तेर सारखी शहरे प्रसिद्धीस आली.
सातवाहन राजे हे वैदिक धर्माचे अनुयायी व पुरस्कर्ते होते.
यांनी अश्वमेध व राजसूय यज्ञ करून यज्ञपरंपरेचे पुनरूज्जीवन केले. यज्ञप्रसंगी
भरपूर दानधर्म केला जाई. सूर्यपूजा, यक्षपूजा, मातृदेवता, नागदेवता
इत्यादींना या काळात महत्त्व प्राप्त झाले.
शैव व वैष्णव धर्माबरोबरच बौद्ध धर्माचाही विकास झाल्याचे
दिसून येते. बौद्ध भिक्षूसाठी अनेक विहार व स्तूप बांधून त्यांच्या
उदरनिर्वाहाचीही व्यवस्था केली जाई.
सातवाहनकालीन सामाजिक परिस्थिती :
सातवाहन काळात वर्णाश्रम व्यवस्था प्रचलित होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णाचा
त्यात समावेश होता. त्यांची कर्तव्ये व अधिकार ठरलेले असत. वर्णव्यवस्थेचे रूपांतर
जाति व्यवस्थेत झाले. जातीचे पोटजाती व उपजातींमध्ये भेद निर्माण झाले. सोळा
संस्कारांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते.
सातवाहन काळात एकत्रित कुटुंब पद्धती प्रचलित होती. लोक
शाकाहारी व मांसाहारी अन्न आहारात घेत असत. या काळातील शिल्पकला, चित्रकला व उत्खननीत वस्तूंवरून त्यांची सौंदर्यदृष्टी
स्पष्ट होते. यामध्ये बांगड्या, ताईत, मणी, कर्णभूषणे, पैंजण, अंगठ्या यांचा समावेश होतो. शिकार, दुवंदव, रथशर्यती, कोंबड्यांची झुंज, सोंगट्या, फुगडी, गायन, वाद्य, नृत्य, सारिपाट ही मनोरंजनाची साधने होती.
सातवाहनकालीन प्रशासन व्यवस्था :
२००० वर्षांपूर्वी वाहतुकीच्या सोयी नसताना सातवाहन राजांनी
४६० वर्षे उत्कृष्ट प्रशासनामुळे महाराष्ट्रावर राज्य केले. रज्जक, अमात्य, सचिव अशा मंत्र्यांची नेमणूक
राजांच्या मदतीसाठी केली जाई. सातवाहनकालीन प्रशासनातील शेवटचा घटक ‘ग्राम' होय. गावच्या प्रमुखास ग्रामणी, ग्रामपती, ग्रामकुट म्हटले जाई.
परकीय बाजारपेठांत भारतीय वस्तूंना महत्त्व असल्यामुळे पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर अशा कला केंद्रांचा
उदय झाला. येथे कलाकुसरीच्या वस्तू, हस्त
कारागिरीच्या वस्तू बनवल्या जात. सातवाहन कालीन कलेमध्ये प्रामुख्याने वास्तू, शिल्प, स्थापत्य आणि चित्रकलेचा
समावेश होतो.
स्तुपाची निर्मिती ही गौतम बुद्ध व बोधिसत्त्व प्राप्त
केलेल्या साधु पुरुषांच्या अवशेषांचे व स्मृतीचे जतन करण्यासाठी केली जाई. स्तूप
हे आकाराने अर्धगोलाकार असून या काळातील स्तूप अजंठा, कार्ले, भाजे, नाशिक येथील लेण्यांत आढळून येतात. बौद्ध भिख्खूच्या
प्रार्थना स्थळाला चैत्यगृह म्हणतात. बौद्ध भिख्खूच्या निवासासाठी विहारांची
निर्मिती करण्यात आली. सातवाहन कालोन भित्तिचित्राचे नमुने अजंठा, वेरूळ, कार्ले , भाजे, जुन्नर, पितळखोरा इ. ठिकाणच्या लेण्यातून पाहावयास मिळतात. अशा
प्रकारे सातवाहन काळामध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाल्याचे दिसून येते.
अजंठा स्थापत्य कला लेणे |
वाकाटकघराणे :
सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर वाकाटकांच्या सत्तेचा
महाराष्ट्रात उदय झाला. वाकाटक काळात महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगती झाली.
राजकीय परिस्थिती : - अजंठा
लेण्यांमध्ये वाकाटकांना ‘वाकाटक वंशकेतु' असे म्हटले
आहे. वायुपुराण व बिदर ताम्रपटातून ‘विंध्यशक्ती' याला वाकाटक घराण्याचा संस्थापक असे म्हटले आहे.
विंध्यशक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र प्रथम प्रवरसेन याने इ. स. २७० ते इ. स.
३३० पर्यंत ६० वर्षे राज्य केले. हा या घराण्यातील सर्वांत बलशाली राजा होय. याने
कोल्हापूर, सातारा, सोलापूर, दक्षिण कोसल, कलिंग व
आंध्र हा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला. हा वैदिक धर्मानुचारी असून याने चार
अश्वमेध यज्ञ केले.
प्रवरसेनच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याची विभागणी
गौतमीपुत्र व सर्वसेन या पुत्रामध्ये झाली.
१) ज्येष्ठ शाखा : - प्रवरसेन
पुत्र गौतमीपुत्र यांचा मुलगा पहिला रुद्रसेन जो समुद्रगुप्ताचा समकालीन होता.
समुद्रगुप्ताशी याने सलोख्याचे संबंध ठेवले. यानंतर याचा पुत्र पृथ्वीसन हा राजा
बनला. त्याने आपला मुलगा दुसरा रुद्रसेनचा विवाह दुसरा चंद्रगुप्तची कन्या
प्रभावती गुप्तशी केला व राजधानी नागपूरजवळ नंदिवर्धन येथे आणली. इ. स. ४९०च्या
सुमारास वाकाटकांची ज्येष्ठ शाखा ही वत्सगुल्म शाखेत विलीन झाली.
२)वत्सगुल्म शाखा : - पहिल्या
प्रवरसेनचा द्वितीय पुत्र सर्वसेन याने राजधानी वत्सगुल्म (सध्याचे वाशिम) येथे
स्थापन केली.
सर्वसेन हा उत्तम कवी होता. त्याने ‘धर्ममहाराज' ही उपाधी
घेतली व 'हरिविजय' या प्राकृत काव्याची रचना
केली. यानंतर दुसरा विंध्यशक्ती, दुसरा प्रवरसेन, देवसेन व हरिसेन असे राजे होऊन गेले. इ. स. ५५० च्या
सुमारास महिष्पतीच्या कलचुरींनी वाकाटकांच्या विदर्भात आपले राज्य स्थापन केल्याने
या सत्तेचा -हास झाला.
वाकाटकाचे योगदान : - वाकाटक राजे
हे साहित्य, विदया व कलेचे भोक्ते व आश्रयदाते होते. हिंदू धर्म आणि
संस्कृती यांचे रक्षण करण्याची जबाबदारी यांनी पार पाडली. धार्मिक दृष्ट्या
सहिष्णू असल्याने या काळात सर्वच धर्माचा विकास झाला. वंशपरंपरागत राजकीय सत्ता
असूनही यांनी सत्तेचा अनियंत्रित वापर केला नाही. योग्य लष्कर व प्रशासनाद्वारे
यांनी आपला साम्राज्य विस्तार व सुस्थिरता टिकवण्याचे काम केले. जमीन महसूल, आयात-निर्यात कर, मांडलिक
राजांकडून येणारी खंडणी व राजकीय स्थिरतेमुळे या काळात आर्थिक प्रगती झाल्याचे
दिसून येते.
कवी कालिदासाचे अनेक वर्षे वाकाटकाकडे वास्तव्य असल्याने
त्यांनी 'मेघदुत'ची रचना येथे केली. वाकाटक
राजांनी कवी व विद्वानांना राजाश्रय दिला. थोडक्यात वाकाटकचा काळ हा
महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा काळ म्हणून ओळखला जातो.
बदामीचे चालुक्य घराणे :
वाकाटकानंतर महाराष्ट्रामध्ये चालुक्य घराण्याची सत्ता
प्रस्थापित झाली.
राजकीय परिस्थिती : - बदामीच्या
चालुक्य घराण्यातील पहिला राजा जयसिंह होय. पहिला पुलकेशी हा या घराण्यातील बलशाली
राजा होय. याने अश्वमेध यज्ञ केला. साम्राज्याची व वातापी (बदामी) या राजधानीची
पायाभरणी यानेच केली. कीर्तीवर्मन हा एक पराक्रमी राजा बदामीच्या चालुक्य घराण्यात
होऊन गेला. याने आपल्या ११ वर्षांच्या काळात कदंब व नल राजांचा पराभव केला. अनेक
राजांना आपले मांडलिक बनवले. कीर्तीवर्मनचा लहान भाऊ मंगलेश हा गादीवर आला. याने
कल्चुरी व रेवती राजांचा पराभव केला. यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात
झालेल्या यादवी युद्धात त्याचा पुतण्या दुसरा पुलकेशी विजयी होऊन गादीवर आला.
दूसरा पुलकेशी हा या घराण्यातील सर्वांत पराक्रमी व बलशाली
राजा होय. वारसाहक्काकरिता राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. परंतु दुस-या पुलकेशीने
सामंत व मांडलिक राजांवर पकड निर्माण केली. सैन्यव्यवस्था बळकट बनवली. याने मौर्य, कलचुरी, नल, राष्ट्रकूट, कदंब, गंग, आलुप वगैरे राजांचा पराभव करून महाराष्ट्र, कोकण, माळवा, विदर्भ इ. प्रांत जिंकून घेतले.
याचवेळी
उत्तर भारतातील प्रभावशाली व सामर्थ्यवान राजा हर्षवर्धन याचे आक्रमण झाले; परंतु या झालेल्या युद्धात हर्षवर्धनचा पराभव करून चालुक्य राजा दुसरा पुलकेशीने आपले
श्रेष्ठत्व सिद्ध
केले. ऐहोळ येथील
शिलालेखात रवि कीर्ती याने दुस-या पुलकेशीवर मिळवलेल्या विजयाची माहिती मिळते.
यानंतर त्याने कलिंग व कोसल हे देश ही जिंकले.
पल्लव राजा नरेंद्रसिंह वर्मा याने पुलकेशीचा पराभव केला व
या युद्धात दवितीय पुलकेशी मारला गेला. यानंतर पहिला विक्रमादित्य विनयादित्य, विजयादित्य दसरा व कीर्तीवर्मन हे राजे झाले. दसरा
किर्तीवर्मन हा या घराण्यातील शेवटचा राजा होय. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने
याचा पराभव करून ही सत्ता संपुष्टात आणली.
कल्याणीचे चालुक्य : - राष्ट्रकुटांनी
बदामीच्या चालुक्याचा पराभव करून महाराष्ट्रात स्वत:चा एकछत्री अंमल सुरू केला.
राष्ट्रकूट राजा दुसरा कर्क याच्या काळात चालुक्य मांडलिक सरदाराने (दुसरा तैलप)
आपले स्वतंत्र राज्य जाहीर केले. याने चोल, चेदी, कुंतल, ओरिसा येथील राजांचा पराभव
केला. या घराण्यातील सत्याश्रय, पहिला विक्रमादित्य, जयसिंह प्रथम, पहिला
सोमेश्वर असे काही राजे होऊन गेले. चौथ्या सोमेश्वरच्या काळात यादवांनी यांचा
पराभव करून चालुक्य सत्तेचा शेवट केला.
चालुक्यांचे योगदान : - चालुक्यांच्या
दोन्ही शाखांमधील राजे हे कला, साहित्य व विद्येचे उपासक
होते. अनेक विद्वान त्यांच्या दरबारात होते. चालुक्य राजांच्या काळात दक्षिणेत
संस्कृत व कन्नड भाषेत मुबलक साहित्य निर्माण झाले. कवी बिल्हण चे ‘विक्रमांकदेवचरित', विज्ञानेश्वराचे, ‘मिताक्षरा', पंपाचे ‘पंपरामायण', सोमेश्वर तिसरा याचे ‘मानसोल्लास' अशा अनेक
ग्रंथांची निर्मिती झाली. या काळातील वास्तुशिल्पे आजही त्यांच्या वैभवाची साक्ष
देतात. बदामी, हंपी, ऐहोळ, पट्टदकल्ल, श्रवणबेळगोळ येथील मंदिरे
यांच्या स्थापत्याची प्रगती दर्शवतात. ही सर्व मंदिरे द्रविड शैलीची आहेत.
चालुक्य हे वैष्णव पंथी असले तरी धर्मसहिष्णुतेचे धोरण
त्यांनी अवलंबलेले दिसून येते. चालुक्यांनी सामाजिक, धार्मिक, आर्थिक व कला स्थापत्याच्या दृष्टीने केलेले कार्य
उल्लेखनीय आहे.
चालुक्य घराण्याच्या ऱ्हासानंतर इ. स. ७५३च्या सुमारास
राष्ट्रकूट राजे महाराष्ट्रावर सत्तारुढ झाले. प्रारंभी हे चालुक्यांचे सामंत
होते. राष्ट्रकुटांची नंदिवर्धन (अचलपूर), सातारा जिल्ह्यातील
माण, व मराठवाड्यातील लातूर येथे सत्ताकेंद्रे निर्माण झाली.
यापैकी लातूर येथील सत्तेने ऐतिहासिक नावलौकिकता मिळवली. त्याचा संक्षिप्त इतिहास
पुढीलप्रमाणे आहे.
राजकीय इतिहास : - दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक राजा
होय. प्रारंभी हा गुजरातमधील चालुक्यांचा सामंत अधिकारी होता. चालुक्यांच्या
दुर्बळ उत्तराधिकारी राजांचा फायदा घेत याने आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना
केली. उत्तरेस नर्मदेपासून ते दक्षिणेस तुंगभद्रेपर्यंतचा प्रदेश जिंकून आपला
साम्राज्य विस्तार केला. दंतीदुर्गनंतर त्याचा चुलता कृष्ण प्रथम हा गादीवर आला.
त्याने १८ वर्षे राज्य केले व चालुक्यांची उरलेली सत्ता समूळ नष्ट केली. कृष्ण
प्रथम या राजाने जगप्रसिद्ध असलेले वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले. यावरूनच
त्याची वैभवता व संपन्नता दिसून येते.
राजा कृष्णनंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र गोविंद दुसरा व
त्यानंतर राजा ध्रुव (ध्रुवधारावर्ष) हे गादीवर आले. याने आपल्या १३ वर्षांच्या
काळात राष्ट्रकुटांचा उत्तर भारतात प्रभाव वाढवला. यानंतर राजा बनलेल्या गोविंद
तिसरा याने कन्नोजचा सम्राट नागभट्ट व त्याच्या मित्र
संघावर हल्ला करून त्यांचा पराभव केला. याने उत्तर भारतातील अनेक राजांना मांडलिक
बनवून त्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्या. अमोघवर्ष हा एक साहित्यिक व शांतताप्रिय
राष्ट्रकूट राजा होऊन गेला. याने ‘रत्नमालिका' व 'कविराजमार्ग' या
ग्रंथांची रचना केली. राजा कर्क हा राष्ट्रकुटांचा शेवटचा राजा होय. कल्याणीचे चालुक्य
व परमारांनी केलेल्या आक्रमणामुळे राष्ट्रकुटांच्या सत्तेचा -हास झाला.
आर्थिक जीवन : - शेती हा या
काळातील प्रमुख व्यवसाय होता. भूमी ही राजाच्या मालकीची असे. शेतसारा/महसूल हे
राजाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने त्याची मोजणी, पाणीपुरवठा, पतपुरवठा
यासाठी राजाकडून मदतीची उदाहरणे मिळतात. कापूस, गूळ, कापड, मातीची भांडी, धातूच्या वस्तू अशा अनेक गोष्टींचा व्यापार केला जाई. या
काळात अंतर्गत व परकीय व्यापारात भरभराट झाल्याचे दिसून येते.
धार्मिक परिस्थिती : - राष्ट्रकूट
राजे हे जैन धर्माचे अनुयायी होते. तरीही त्यांनी हिंदू मंदिरे बांधून शैव व
वैष्णव धर्मालाही राजाश्रय दिलेला होता. बौद्ध विहार बांधल्याचेही दाखले मिळतात.
थोडक्यात, राष्ट्रकूट राजे हे धार्मिक दृष्ट्या सहिष्णुता बाळगणारे
होते.
सामाजिक परिस्थिती : - चातुर्वर्ण्य
व जातिव्यवस्था या काळातही होती. या काळात जातिव्यवस्था तीव्र असल्याचे दिसून
येते. एकत्रित कुटुंब पद्धती या काळात अस्तित्वात होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती व
तिच्या पोटजातींमध्ये हा समाज विभागला गेला होता. आंतरजातीय व एक गोत्र विवाह होत
नसे. या काळातील लोक गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मूग इत्यादी अन्नाचे सेवन करत तसेच मासाहारही करत.
कला व स्थापत्य : - राष्ट्रकूट
काळात कला व स्थापत्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती झाल्याचे तत्कालीन मंदिर व
शिल्पातून दिसून येते. वेरूळचे कैलास लेणे हे एकाश्म दगडात कोरलेले व जगप्रसिद्ध
असलेले मोठे लेणे होय.
थोडक्यात, राष्ट्रकुटांच्या काळात
महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगती झाल्याचे स्पष्ट होते.
वेरूळचे कैलास लेणे |
शिलाहार घराणे :
शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकुटांचे व नंतर चालुक्य व
यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुस-या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास
सामंत म्हणून इ. स. ६३० च्या सुमारास नेमले व चांदोर (सध्याचे चंद्रपूर) ही
राजधानी बनवली. इ. स. ७६५ च्या सुमारास राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथमने हा भाग
जिंकून शिलाहारांना येथील सामंत म्हणून नेमले. शिलाहारांनी गोमंतक येथील वलीपट्टण
येथे आपली राजधानी बनवली. शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता
केंद्रे निर्माण झाली.
दक्षिण कोकणचे शिलाहार :- या घराण्याचा मूळ संस्थापक विद्याधर जीमुतवाहन हा असून तो
उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे याचे मूळ स्थान होय. सोनेरी गरुड पक्ष्याचे
चिन्ह' हे जीमुतवाहन राजघराण्याच्या निशाण्यावर असल्याचे दिसून
येते. सणफुल्ल, धम्मीयार, अवसर पहिला, इंद्रराज, अवसर तिसरा, रठ्ठराज असे काही राजे या घराण्यात होऊन गेले. खारेपाटण
ताम्रपटातील रठ्ठराज हा शेवटचा राजा असल्याचे दिसून येते.
उत्तर कोकणचे शिलाहार : - दक्षिण
कोकणातील शिलाहारापेक्षा कमी प्राचीन असलेले घराणे म्हणजे उत्तर कोकणचे शिलाहार
होय. कपर्दी' हा या घराण्याचा मूळ पुरुष होय. प्रारंभी हा राष्ट्रकुटांचा
मांडलिक होता. या घराण्यातील राजांमध्ये पुल्लशक्ती, झंझ, पहिला व दुसरा वज्जड, छित्तराज, अपरार्क पहिला, मल्लिकार्जुन
व सोमेश्वर असे अनेक राजे होऊन गेले. उत्तर कोकणच्या शिलाहार राजांची प्रथम
राजधानी दण्डराजापुरी नंतर ठाणे व काही काळ घारापुरी येथे वास्तव्यास असल्याचे
संकेत मिळतात.
कोल्हापूरचे शिलाहार : - शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, मिरज, क-हाड व कोकणच्या काही भागांवर राज्य करत होते. सुवर्ण गरुड ध्वजाचे चिन्ह यांनीही राजघराण्याची निशाणी म्हणून वापरल्याचे दिसते. जतिग हा या घराण्याचा मूळ पुरुष असून तो प्रारंभी राष्ट्रकुटांचा माडलिक होता. या घराण्यातील अन्य राजांमध्ये न्यायवर्मा, चंद्र, जतिक दुसरा, मारसिंह, दुसरा गुहल, पहिला भोज, बल्लाळ, गडरादित्य, विजयादित्य व दुसरा भोज असे राजे होऊन गेले.
दुसरा भोज हा या घराण्यातील प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्याने
कोल्हापूर, वळिवडे व पन्हाळा या राजधान्या बनवल्याचा उल्लेख शिलालेखात
सापडतो. याने दान दिल्याचा एक शिलालेख कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात असून
त्याची लिपी देवनागरी व भाषा संस्कृत आहे. याने बावडा, भुदरगड, खेळणा, पन्हाळा, पावनगडे, सामनगड व वाईजवळील पांडवगड असे पंधरा किल्ले बांधल्याचा
उल्लेख सापडतो.
शिलाहारांचे योगदान : - शिलाहारकालीन
समाज हा ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या जातींमध्ये
विभागला होता. जातीनिहाय व्यवसाय केले जात. भोजनामध्ये शाकाहारी व मांसाहारी
अन्नाचा समावेश असे. सुतार, लोहार, कुंभार, चांभार, पाथरट यांच्या उदयोगाबरोबरच
धातू उद्योग, कापड उद्योग , हस्तिदंती
उद्योगही या काळात चालत असत. शेती हा या काळातील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता.
शिलाहार राजे जैन धर्माचे अनुयायी होते. यांनी कोल्हापूर, खिद्रापूर येथे जैन मंदिरे बांधल्याचे उल्लेख मिळतात. हे
धर्मसहिष्णू राजे होते. त्यांनी हिंदू धर्मीयांसाठी मंदिरे व बौद्ध भिख्खूच्या
निवासासाठी विहारे बांधली. अशा प्रकारे शिलाहार राजांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.
गोड घराणे :
प्राचीन महाराष्ट्रामध्ये शेवटच्या काळात हूण व मुस्लिम
आक्रमणांमुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. या वेळी
महाराष्ट्रात यादवांनी देवगिरी येथे आपली सत्ता प्रस्थापित केली. याच काळात चांदा
(चंद्रपूर) येथे गोंड घराण्याने आपली सत्ता प्रस्थापित केली..
ऐतिहासिक साधने : - १८६९ मध्ये
मेजर ल्युसी स्मिथने गोंड घराण्याच्या इतिहासावर सर्वप्रथम प्रकाश टाकला. यांनी
स्थानिक परंपरा, हस्तलिखिते व मौखिक साधनांद्वारे हा इतिहास लिहिला. शिलालेख
व इतर साहित्यिक साधनांद्वारेही गोंड घराण्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो.
राजकीय
परिस्थिती : - कोल भील हा या घराण्याचा संस्थापक होय. त्याने विखुरलेल्या गोंड जमातीला
एकत्र करण्याचे व नाग वंशीयांविरुद्ध लढा देण्याचे तंत्र शिकवण्याचे काम केले. भीम
बल्लाळ सिंहापासून गोंडांचा इतिहास लिखित स्वरूपात पाहावयास मिळतो. याने शिरपूर येथे
राजधानी हलवली. केशरसिंगाच्या काळात यांच्या साम्राज्याचा विस्तार भिल्ल
देशापर्यंत झाला. या राजांच्या काळात गोंड घराण्याचा सर्वाधिक संपन्नतेचा काळ
होता. घोडे व बैल यांच्या संख्येतही या काळात वाढ झाली. दिनकर
सिंग हा एक 'शांतताप्रिय, कला, विद्या व साहित्याचा भोक्ता असलेला राजा होउन गेला. अनेक कवी व विद्वानांना याने आपल्या
दरबारात आश्रय दिला नंतरच्या काळात सुर्जा बल्लाळ सिग हा महत्त्वपूर्ण राजा होऊन
गेला त्याने बनारस व लखनऊ येथे जाऊन युद्ध व संगीत (गाणे) या कलांचे शिक्षण घेतले.
खांडख्या बल्लाळ शाहने १४३७-१४६२ पर्यंत राज्य केले हा
त्वचारोगाने त्रासला होता. पत्नीच्या सल्याने बल्लाळपूर येथे तो किल्ला बांधून
राहू लागला व राजधानीचे शिरपूरहून बल्लाळपूर येथे स्थलांतर केले. तसेच याने
अचलेश्वराचे मंदिर बांधले. गादीवर आलेल्या हिरशाह याने मंदिराच्या तटबंदीचे काम पूर्ण
केले. याने जंगले स्वच्छ करून जनतेला राहण्यासाठी वस्तीची सोय करून दिली, कृष्ण शाह, बीर शाह, गोविंद शाह, हिराई, राम शाह, नीलकंठ शाह, असे राजे होऊन गेले.
नीलकंठ शाहच्या काळात चांदा प्रातावर रघुजी भोसले आक्रमण
झाले व त्याला रघुजी भोसल्यांनी कैद केले. कैदेतच त्याचा मृत्यू झाला व नागपूरच्या
रघुजी भोसलेच्या प्रदेशात हा भाग समाविष्ट करण्यात आला.
गोंड घराण्याचे योगदान : - ६२ गोंड
राजांनी अनेक शतके महाराष्ट्रातील देवगड, नागपूर, चंद्रपूर या प्रदेशांवर राज्य केले.
गोंड राजे हे कला, साहित्य व
विद्येचे भोक्ते होते. त्यांनी आदिवासी जमातीतील लोकांना संघटित केले. त्यांना
लष्करी प्रशिक्षण दिले. तसेच त्यांचा विकास घडवून आणला. एकंदरीत आदिवासी समाजाला
इतिहासात स्थान मिळवून देण्याचे काम गोंडांनी केले. म्हणूनच यांच्या वैभवशाली
कालखंडाची नोंद इतिहासात होणे आवश्यक ठरते.
No comments:
Post a Comment