भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इतका प्रदीर्घ इतिहास
आणि इतकी प्राचीन संस्कृती असलेले फारच थोडे देश जगामध्ये आहेत. अश्मयुगापासून
भारतात लोक राहत आले आहेत. भारताबाहेरील निरनिराळ्या प्रदेशांतून लोक भारतात आले.
ते येथील संस्कृतीशी एकरूप झाले. यातून एक संमिश्र भारतीय संस्कृती आकारास आली आहे.
देशाच्या वेगवेगळ्या भागांत राहणारे आपण सारे भारतीय आहोत.
भाषा, साहित्य, कला इत्यादींत विविधता असली, तरी भारतीय म्हणून
आपण एक आहोत. ही विविधता भारतीयांमध्ये ऐक्यभावना निर्माण करण्यास पोषक ठरली आहे.
आपले सामाजिक जीवन विविधतेमुळे समृद्ध झाले आहे.
भारतातील भाषा :- भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. हिंदी
आणि इंग्रजी या भाषांचा वापर आपल्या देशात केला जातो. मराठी ही महाराष्ट्राची
राजभाषा आहे.
सण-उत्सव :- भारतामध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन, पारशी, यहुदी या धर्माचे
लोक राहतात. देशात विविध सण-उत्सव साजरे केले जातात. शेती हा आपल्या देशातील मुख्य
व्यवसाय आहे. आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरणाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रात
दसरा, दिवाळी, होळी; पंजाबात वैशाखी, आंध्रप्रदेशात
एरूवाक पुन्नम, तमिळनाडूत पोंगल, तर केरळमध्ये ओणम हे उत्सव साजरे केले
जातात. रमजान ईद, नाताळ, बुद्धपौर्णिमा, संवत्सरी, पटेटी हे
महत्त्वाचे सण आहेत.सण आणि उत्सव कोणत्याही धर्माचे असोत, सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात.एकमेकांना
शुभेच्छा देतात. त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते.
वेशभूषा आणि आहार :- भारतीयांच्या
वेशभूषेत आणि आहारात विविधता आढळते. वेशभूषा ही त्या त्या भागातील निसर्ग, हवामान आणि परंपरा
यांवर अवलंबून असते. भारतातील लोकांच्या आहारातही विविधता आढळते. ही विविधता
हवामान, पिके अशा भौगोलिक फरकांमुळे झालेली आहे. उदाहरणार्थ, पंजाबी लोकांच्या
आहारात प्रामुख्याने दाल-रोटी असते. किनारपट्टीवरील लोक भात-मासे खातात.
निवारा :-घरे बांधण्याच्या पद्धतींतही भारतात
विविधता आढळते. ग्रामीण भागांत अनेक घरांना कुडाच्या भिंती असतात. काही घरे कौलारू
असतात. जास्त पावसाच्या प्रदेशातील घरे उतरत्या छपराची असतात. जेथे पाऊस कमी पडतो, तेथे धाब्याची घरे
असतात. मोठ्या शहरांमध्ये अनेक मजली इमारती दिसून येतात.
खेळ :- प्राचीन काळापासून भारतात अनेक प्रकारचे
खेळ खेळले जातात. विटी-दांडू, बुद्धिबळ, कुस्ती, झिम्मा, फुगडी, मल्लखांब, लगोरी, आट्यापाट्या, खोखो, कबड्डी असे
कितीतरी खेळ आपण खेळतो. हॉकी, क्रिकेट इत्यादी आधुनिक खेळही आपल्याकडे
लोकप्रिय कबड्डी
कबड्डी |
आपल्या जीवनात खेळाला फार महत्त्वाचे स्थान आहे. खेळांमुळे
सहकार्य, एकजूट हे गुण आपल्या अंगी बाणतात. खेळात हारजीत यापेक्षा
जिद्द आणि जोश या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
कला :- भारतात संगीत, नृत्य, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला अशा अनेक
कला विकसित झाल्या आहेत.फार पूर्वीपासून आपल्या देशात विविध प्रकारचे संगीत प्रचलित
आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या 'हिंदुस्थानी संगीत’ आणि ‘कर्नाटकी संगीत
अशा दोन प्रमुख पद्धती आहेत. याशिवाय भजन, कव्वाली, लावणी, पोवाडा यांसारखे
लोकसंगीताचे अनेक प्रकार आहेत.
नागा नृत्य |
भारतात नृत्याची परंपराही फार जुनी आहे. अनेक प्रकारची
लोकनृत्ये आहेत. संथाळ, नागा, मिझो या लोकांची
नृत्ये विशेष आकर्षक असतात. महाराष्ट्रात कोळीनृत्य प्रसिद्ध आहे. पंजाबमधील
भांगडा, राजस्थानातील घुमर, आसामातील बिहू, गुजरातमधील गरबा, कर्नाटकातील
यक्षगान, केरळमधील कैलकोटीकळी हे भारतीय लोकनृत्याचे काही प्रकार
आहेत. भरतनाट्यम, कथ्थक, कथाकली इत्यादी
शास्त्रीय नृत्यप्रकार विशेष प्रसिद्ध आहेत.आपल्या देशात फार प्राचीन काळापासून
वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला विकसित झाल्या आहेत. मातीची नक्षीदार भांडी, वेताच्या व बांबूच्या
टोपल्या, परड्या, फुलदाण्या अशा विविध वस्तू आजही सर्वत्र
तयार केल्या जातात. भारतात विकसित झालेल्या हस्तकलेतून कारागिरांचे कौशल्य आणि
सौंदर्यदृष्टी दिसून येते.
भारतातील चित्रकलेची परंपरा अश्मयुगातील गुहाचित्रांपासून
सुरू होते. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रकलेचे सुंदर नमुने अजिंठा येथील
लेण्यांमध्ये आहेत. ही चित्रे सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी रंगवलेली आहेत. या
चित्रांत वापरलेले रंग अश्यापही ताजे वाटतात. या चित्रांची कीर्ती जगभर पसरली आहे.महाराष्ट्रातील वारली, बिहारमधील मधुबनी या आदिवासी चित्रशैली
प्रसिद्ध आहेत.
वास्तू :- भारतात अनेक ठिकाणी प्राचीन लेणी आढळतात.
कालें, अजिंठा, वेरूळ येथील लेणी प्रसिद्ध आहेत. सांची
येथील स्तूप प्रेक्षणीय आहे. कोणार्कचे सूर्यमंदिर, अबू येथील दिलवाडा मंदिरे, दिल्लीचा कुतुबमिनार, आग्रा येथील ताजमहाल वैशिष्ट्यपूर्ण
आहेत.
रायगड किल्ला |
No comments:
Post a Comment