Thursday, November 29, 2018

इंग्रज राजवटीचे परिणाम



            
इंग्रजांच्या आगमनापूर्वी एक अतिशय संपन्न देश अशी भारताची प्रसिद्धी होती. कापड उद्योग, हस्तकला व्यवसाय व अन्य व्यापारी वस्तूंचे उत्पादन यांत भारतीय आघाडीवर होते. भारताचा व्यापार जगभर  चालत होता, पण इंग्रजांच्या आर्थिक व व्यापारी धोरणांमुळे भारतातील संपत्तीचा ओघ आता इंग्लंडकडे जाऊ लागला. त्यातून भारताची पिळवणूक सुरू झाली.  


 भारतात बहुसंख्य लोक खेड्यांतच राहत. ते शेतीवर उपजीविका करत. त्यांना लागणाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू गावातच तयार होत. भारतीय अर्थव्यवस्थेत स्थानिक कारागीर हा महत्त्वाचा दुवा होता. ही परिस्थिती इंग्रजांच्या राजवटीत बदलली.

कापड उद्योगाचा ऱ्हास :- कापड उद्योग हा सर्वात मोठा उद्योग  होता. भारतात तयार झालेले कापड युरोपात अतिशय लोकप्रिय होते. युरोपात त्याला मोठी मागणी होती.

इंग्लंडमध्ये तयार होणारे कापड भारतात विकले जावे म्हणून इंग्रजांनी भारतीय कापड उद्योगावर जबर कर बसवले. त्यामुळे भारतीय कापड महाग आणि इंग्रजांचे कापड स्वस्त अशी परिस्थिती निर्माण झाली. इंग्रजांच्या अशा धोरणामुळे एकेकाळी भरभराटीला आलेला भारतीय कापड उद्योग डबघाईला आला. कसबी कारागीर व विणकर बेकार झाले.

 इतर उद्योगधंद्यांची पीछेहाट :- इ.स. १८५३ मध्ये इंग्रजांनी भारतात रेल्वेमार्ग सुरू केला. पुढील काळात रेल्वेमार्गाचे जाळे देशभर  पसरले. या सोईमुळे ब्रिटिश माल देशाच्या कोनाकोप-यांत पोहोचू लागला. यंत्रावर तयार झालेल्या परदेशी मालाशी स्थानिक कारागिरांना स्पर्धा करता येणे शक्य नव्हते. परिणामी भारतीय उड्योग, व्यवसाय बुडाले.
शेतकरी दरिद्री बनला :- शेतसारा हे सरकारच्या उत्पन्नाचे मुख्य  साधन  होते. पूर्वी शेतसारा हा धान्याच्या स्वरूपात भरला जात असे. इंग्रजानी  शेतसारा पैशाच्या स्वरूपात भरण्याची सक्ती केली. तो वेळच्या वेळी भरावा लागे. त्यात सूट दिली जात नसे. शेतसारा भरण्यासाठी शेतक-यांकडे रोकड पैसा नसे, म्हणून ते जमिनी गहाण टाकून सावकाराकडून कर्ज घेत. कर्जाची परतफेड करता आली नाही, तर त्यांना जमिनी विकाव्या लागत.  

ज्या पिकांना परदेशात मागणी असेल, तीच पिके शेतक-यांनी काढावीत, इतर पिके काढू नयेत, अशी इंग्रजांनी भारतीय शेतक-यांवर सक्ती केली. त्यामुळे कापूस, तंबाखू, नीळ इत्यादी नगदी पिके शेतक-यांना काढावी लागत. नगदी पिके म्हणजे रोख पैसा मिळवून देणारी पिके. ही पिके इंग्रज व्यापारी त्यांच्याकडून कमी किमतीला विकत घेत आणि जास्त किमतीला विकत. त्यामुळे शेतकरी वर्ग नाडला जाऊ लागला.

इंग्रजांनी केलेल्या सुधारणा :- इंग्रजांनी भारताचे  आर्थिक शोषण केले, पण राज्यकारभाराच्या सोईसाठी त्यांनी काही सुधारणाही अमलात आणल्या. या सुधारणांमुळे भारतीयांना काही अप्रत्यक्ष फायदे झाले.

 भारतात रेल्वेमार्गाचे जाळे पसरले. रेल्वेसारख्या दळणवळणाच्या सोईमुळे भारतीयांचे परस्परांतील संबंध वाढीस लागले.

गाव, तालुका, जिल्हा, प्रांत अशा पातळ्यांवर सरकारी अधिका-यांची नेमणूक करण्यात आली. तलाठी, पोलीस पाटील, कलेक्टर, न्यायाधीश यांसारख्या अधिका-यामुळे प्रशासनाची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण झाली.

 पाश्चात्त्य शिक्षण देणा-या शाळा सुरू झाल्या. त्यामुळे पाश्चात्त्य कल्पना व विचारांचा भारतात प्रसार होऊ लागला. छापखाने आल्यामुळे वर्तमानपत्रे, विविध विषयांवरचे ग्रंथ प्रसिद्ध होऊ लागले. यामुळे भारतीय समाजात वैचारिक जागृती होऊ लागली.

No comments:

Post a Comment

Featured post

क्रांतियुग

समाजजीवनाच्या राजकीय , सामाजिक , धार्मिक , आर्थिक अशा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात , अशा बदलांना क्रांती ...