Monday, November 26, 2018

विज्ञान आणि मानवी जीवन



भटके जीवन जगणारा अश्मयुगीन मानव आणि अवकाशात झेप घेणारा आजचा विज्ञानयुगातील मानव यांच्या जीवनात फार मोठा फरक पडला आहे.

सुरुवातीच्या हजारो वर्षांच्या काळात माणसाने काही महत्त्वाचे शोध लावले. हत्यारे बनवणे, अग्नी निर्माण करणे, चाकाचा उपयोग, शेती करण्याचे ज्ञान इत्यादींचा त्यात समावेश होता. या प्रकारच्या ज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन काहीसे सुखी बनले व स्थिर झाले. अलीकडच्या काळात, विशेषतः सोळाव्या शतकापासूनच्या पुढील चार शतकांत शरीरशास्त्र, खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान अशा विज्ञानाच्या विविध शाखांत अनेक शोध लागले. या शोधांचा माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग व्हावा, यासाठी यंत्रे व उपकरणे यांचे शोध लावण्यात आले. त्यामुळे माणसाचे जीवन अधिक सुखी झाले.

विसाव्या शतकात तर एकामागोमाग एक क्रांतिकारक शोध लागले.
राइट बंधूनी विमानाचा शोध लावला. त्यामुळे माणूस आकाशातूनही प्रवास करू लागला. प्रवासाचा वेगही वाढला. अति वेगाने जाणारी विमाने माणसाने बनवली आहेत. विमानविदेतील प्रगतीमुळे आज जगातील देश परस्परांशी हवाई मार्गाने जोडले गेले आहेत.


राइट बंधू
                                                   


राइट बंधूंनी तयार केलेले विमान


चांगल्याबरोबर वाईट कामासाठीही माणसाने या शोधाचा उपयोग करून घेतला. दुस-या महायुद्धात शत्रूवर बाँब फेकण्यासाठी विमानांचा प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला. त्यामुळे या युद्धात मोठ्या प्रमाणावर जीवित व संपत्तीचा नाश झाला.

अणुशक्ती :- अणुशक्तीचा शोध लागल्यामुळे वीजनिर्मिती करणे शक्य झाले आहे. रोगनिदान, रोगोपचार, शेतीसंशोधन अशा विविध क्षेत्रांतही आज अणुशक्तीचा वापर केला जात आहे; परंतु अणुशक्तीचा विध्वंसक वापरही केला गेला. अमेरिकेने दुस-या महायुद्धाच्या शेवटी जपानविरुद्ध अणुबाँब वापरले. त्यात हजारो लोक मृत्यू पावले आणि काही कायमचे जायबंदी झाले.

अवकाश संशोधन :- अग्निबाणांचा (रॉकेट्स) शोध लागल्याने अवकाश संशोधनाच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले. अग्निबाणांच्या साहाय्याने कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवणे शक्य झाले. उपग्रहांच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे, पृथ्वीवरील वनक्षेत्राचे मापन करणे, नैसर्गिक

अग्निबाण

संकटांची आगाऊ सूचना देणे, जगभरातील देशांमध्ये परस्परांत दूरध्वनी व दूरदर्शन संपर्क प्रस्थापित करणे इत्यादी प्रकारच्या सुविधा आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. अग्निबाणातून अवकाशात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांमुळे व अवकाशयानमुळे ग्रह व उपग्रहांचा अभ्यास करणे शक्य झाले आहे.

माहिती तंत्रज्ञान  :- संगणकाचा शोध हा विसाव्या शतकातील एक महान शोध आहे. मानवी जीवनात त्यामुळे क्रांती घडून आली आहे. वैद्यकीय निदान करणे, कार्यालयातील कामे अचूक व कार्यक्षमतेने करणे, शास्त्रीय संशोधन करणे, प्रवासी तिकिटांचे आरक्षण करणे, सरकारी व अन्य दस्तऐवज जपून ठेवणे, कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे अशा प्रकारची कामे करणे संगणक तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. अलीकडे विकसित झालेल्या इंटरनेटच्या तंत्रज्ञानामुळे माहितीची देवाणघेवाण करणे अत्यंत सोईचे झाले आहे. विविध विषयांशी संबंधित संकेतस्थळे (वेबसाइट्स) संगणकावर उपलब्ध झाल्याने विविध विषयांची अद्ययावत माहिती मिळवणे शक्य झाले आहे. इतिहासाचा अभ्यास करणा-या विद्याथ्र्यांना आपल्या विषयाची माहिती हवी असेल, तर संगणकावर योग्य त्या संकेतस्थळाला भेट देऊन ती माहिती मिळवता येते.

वर वर्णन केलेल्या शोधांखेरीज क्ष-किरण तंत्रज्ञान, यंत्रमानव, ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने, जनुकीय संशोधन, उत्तमोत्तम शेतकी बियाणांचा विकास, अत्याधुनिक दूरध्वनी व भ्रमणध्वनी (मोबाइल) तंत्रज्ञान अशा अनेक प्रकारचे शोध लागल्याने माणसाला प्रगतीचे व विकासाचे मार्ग खुले झाले आहेत. या सर्व सुविधांचा डोळसपणे व संयमाने वापर करायला हवा. अन्यथा आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या राहू शकतात. प्रदूषण, हिंसाचार व  दहशतवाद, गुन्हेगारीची वाढ, मानवी हक्कांचे उल्लंघन या त्यांपैकी काही समस्या आहेत.


प्रदूषण







No comments:

Post a Comment

Featured post

क्रांतियुग

समाजजीवनाच्या राजकीय , सामाजिक , धार्मिक , आर्थिक अशा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात , अशा बदलांना क्रांती ...