Monday, November 26, 2018

क्रांतियुग




समाजजीवनाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात, अशा बदलांना क्रांती म्हणतात. हे बदल ज्या काळात होतात, त्या काळाला 'क्रांतियुग असे म्हणतात. या अर्थाने अठरावे शतक हे क्रांतियुग होते. अठराव्या शतकात अमेरिकेमध्ये स्वातंत्र्ययुद्ध झाले. फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. इंग्लंडमध्ये औदयोगिक क्रांतीची सुरुवात झाली. या घटनांमुळे अमेरिका व युरोपमध्ये काही तात्कालिक बदल घडून आले. तसेच त्यापुढील काळात जगातील इतर देशांवरही त्याचे परिणाम झाले. या घटनांची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ.

अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध :- अमेरिगो व्हेस्पुसी याच्या सागरी मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला, त्यानंतर युरोपमधील अनेक देशांतील लोकांनी या नव्या ठिकाणी जाऊन तेथील प्रदेश बळकावले. इंग्लंडमधील लोकांनी अमेरिकेमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या. शालेय शिक्षण देणे, सार्वजनिक वाचनालये सुरू करणे, स्थानिक कर ठरवणे व अन्य स्थानिक विषयांसंबंधीचे निर्णय घेण्याची वसाहतींना मुभा होती, पण जगातील इतर देशांशी संबंध ठेवण्यास त्यांना परवानगी नव्हती. या वसाहतींच्या व्यापारावरही इंग्लंडचे नियंत्रण होते. अमेरिकेतील नैसर्गिक साधन-संपत्तीचा इंग्लंडच्या फायद्यासाठी उपयोग करून घेणे, हाच यामागे मुख्य हेतू होता. शिवाय गरज भासेल तेव्हा वसाहतीतील लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचा कर वसूल करण्याचाही हक्क इंग्लंडला होता. फ्रान्स या देशाशी झालेल्या युद्धाच्या खर्चाचा काही हिस्सा अमेरिकन वसाहतींनी सोसावा, असा हुकूम जारी करण्यात आला.

इंग्लंडने वसाहतींवर लादलेली अशी बंधने अमेरिकन वसाहतींना मंजूर नव्हती. इंग्लंडच्या संसदेत आमचा प्रतिनिधी नसल्यामुळे आमच्यावर कर लादण्याचा इंग्लंडला अधिकार नाही, आम्ही कर देणार नाही, असे सांगून वसाहतींनी इंग्लंडच्या जुलमाविरुद्ध चळवळ सुरू केली.४ जुलै १७७६ रोजी अमेरिकन वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सर्व माणसे जन्मतः समान आहेत, प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा उपभोग घेण्याचा हक्क आहे. जनता सार्वभौम आहे, असे विचार जाहीरनाम्यात मांडण्यात आले. हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन याने तयार केला.
  
थॉमस जेफरसन

अमेरिकन वसाहतींचा नेता जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडशी, युद्ध झाले. या युद्धात अमेरिकन वसाहतींनी इंग्लंडचा पराभव केला. वसाहतींनी एकत्र येऊन आपले संघराज्य स्थापन केले. जॉर्ज वॉशिंग्टनची पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. राजाविना राज्य चालू जॉर्ज वॉशिंग्टन शकते, हा नवीन विचार अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाने दिला.


   जॉर्ज वॉशिंग्टन
फ्रेंच राज्यक्रांती :- इ. स. १७७४ मध्ये सोळावा लुई फ्रान्सचा राजा झाला. मनाला येईल त्याप्रमाणे तो राज्यकारभार करी. त्याच्या अगोदर होऊन गेलेल्या राजांनीही फ्रान्समध्ये दडपशाही पद्धतीने राज्यकारभार केला होता. लोकांना क्षुल्लक कारणांवरून तुरुंगात डांबले जाई. राजा व त्याचे सरदार चैन आणि ऐषाराम करत. सरदार, धर्मगुरू यांना करातून सूट मिळे. कराचा सर्व बोजा सामान्य लोकांवर पडत असे. राजाच्या विरोधात कटकारस्थाने केल्याच्या संशयावरून अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला.

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील बॅस्टिलच्या तुरुंगात सर्वांना डांबण्यात येत असे. सामान्य लोकांवर होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध   फ्रान्समधील अनेक विचारवंतांनी आवाज उठवला होता. त्यात माँटेस्क्यू, व्हॉल्टेअर, रूसी असे अनेकजण होते. त्यांच्या विचारांमुळे फ्रान्समधील सामान्य लोकांना राजाच्या जुलमाविरुद्ध चळवळ करण्याची प्रेरणा मिळाली. अन्यायाचे प्रतीक बनलेल्या बॅस्टिलच्या तुरुंगावर १४ जुलै १७८९ रोजी लोकांनी हल्ला केला. तुरुंगातील कैदयांना मुक्त केले. पुढे लवकरच राजाच्या जुलमी कारभारातून फ्रान्सची मुक्तता झाली. फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून व्यक्त झालेली स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये आधुनिक जगाच्या उभारणीला साहाय्यभूत झाली आहेत.

औद्योगिक क्रांती :- युरोपमधील देशांचा पूर्वेकडील देशांशी सुरू झालेला व्यापार अठराव्या शतकात भरभराटीला आला. व्यापारात इंग्लंडने इतर युरोपीय देशांच्या मानाने मोठी प्रगती केली होती. आपला व्यापार अजून वाढला पाहिजे, असे इंग्रज व्यापा-यांना वाटले. याच सुमारास इंग्लंडमध्ये विविध प्रकारच्या यंत्रांचे शोध लागले. जॉन के याने धावत्या धोट्याचा शोध लावला. त्यामुळे कापड विणण्याचा वेग वाढला. आर्कराइटने सूतकताईचे यंत्र पाणचक्कीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला. कापड उठ्योगामध्ये होणा-या या यांत्रिक प्रगतीमुळे कापडाचे उत्पादन अनेक पटींनी वाढले. जेम्स बँट याने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. स्टिफन्सन याने वाफेवर चालणारे रेल्वेचे इंजिन तयार केले. शेतीचे उत्पादन वाढवण्यास उपयोगी पडतील असे शोध लागले. अशा नवनव्या शोधांमुळे विविध उदयोग भरभराटीला आले. मोठमोठे कारखाने स्थापन होण्यास सुरुवात झाली व कारखानदारीला चालना मिळाली. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. यालाच औक्ष्योगिक क्रांती असे म्हणतात.
  स्टिफन्सनने तयार केलेले रेल्वे इंजिन
      

युरोपातील उत्पादनवाढीमुळे युरोपीय देशांना बाजारपेठेची आवश्यकता वाटू लागली. त्यांनी आशिया, आफ्रिका खंडांत स्वत:च्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली.

No comments:

Post a Comment

Featured post

क्रांतियुग

समाजजीवनाच्या राजकीय , सामाजिक , धार्मिक , आर्थिक अशा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात , अशा बदलांना क्रांती ...