आधुनिक भारताच्या इतिहासातील १८५७ चा राष्ट्रीय उठवातील महत्त्वाची घटना. इंग्रज राज्यकर्त्यांविरुद्ध जनता व सैनिक यांच्या मनात असंतोष होता. या असंतोषाचा उद्रेक म्हणजे १८५७ चा राष्ट्रीय उठाव होय.
जनतेतील असंतोष :- दारिद्र्य आणि बेकारी यांमुळे देशातील लोक गांजून गेले होते. शेतक-यांवरील कराचा बोजा वाढल्यामुळे शेतकरी असंतुष्ट होते. इंग्रजांनी काही राजेरजवाड्यांची संस्थाने म्हणजे त्यांची राज्ये खालसा केली. काहींचे तनखे बंद केले. संस्थाने खालसा केल्यामुळे सैनिक, कारागीर इत्यादी बेकार झाले. इंग्रजांनी भारतात काही सामाजिक सुधारणा केल्या. सतीची चाल बंद केली. विधवा विवाहास मान्यता दिली. असे कायदे करून इंग्रज सरकार आपल्या धर्मात हस्तक्षेप करत आहे, असे लोकांना वाटू लागले.
सैनिकांतील असंतोष :- इंग्रजांच्या लष्करातील भारतीय सैनिकांना भेदभावाची वागणूक मिळत होती. त्यांना इंग्रज सैनिकांपेक्षा कमी पगार मिळे. बढतीही नाकारली जात असे. लढण्यासाठी भारताबाहेर जाण्याची त्यांच्यावर सक्ती केली जात असे. इंग्रज अधिकारी त्यांची मानहानी करत. सैनिकांनी कपाळाला गंध लावू नये, दाढीमिश्या ठेवू नयेत असे नियम करण्यात आले होते. अशा नियमांमुळे सैनिकांत असंतोष पसरला होता. नव्या प्रकारच्या बंदुका सैनिकांना देण्यात आल्या. या बंदुकांत वापरायची काडतुसे ज्या आवरणात गुंडाळलेली असत, ती आवरणे सैनिकांना दातांनी तोडावी लागत. या आवरणांना गाय व डुक्कर यांची चरबी लावलेली आहे. या बातमीमुळे भारतीय सैनिकांच्या भावना दुखावल्या. अशा अनेक कारणांमुळे सर्वत्र असंतोष धुमसत होता.
उठावाचा भडका :- बंगाल प्रांतातील बराकपूर येथील लष्करी छावणीत २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडे या सैनिकाने इंग्रज अधिकान्यावर गोळी झाडली. पुढे त्यांना फाशी देण्यात आले. यामुळे उठावाचा भडका उडाला.
उठावाची वाटचाल :- मंगल पांडे यांच्या हौतात्म्याने भारतीय शिपायांना लढण्याची प्रेरणा मिळाली. मेरठ छावणीतील संपूर्ण भारतीय पलटणच १० मे १८५७ रोजी बंड करून उठली. त्यांनी इंग्रज अधिका-यांचे हुकूम उघडपणे झिडकारले. मुघल बादशाहा बहादुरशहा यांना इंग्रजांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी सैनिक दिल्लीकडे निघाले. दिल्लीस जात असताना वाटेत त्यांना ठिकठिकाणच्या लष्करी छावण्यांतले सैनिक सामील झाले. त्यांनी दिल्ली काबीज केली. भारताचा बादशाहा म्हणून बहादुरशहा याना गादीवर बसवले. यानंतर सशस्त्र उठावाचा वणवा उत्तर भारतात अन्य ठिकाणी पसरला. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अयोध्येची बेगम हजरतमहल, बिहारमधील जमीनदार कुंवरसिंह, मौलवी अहमदउल्ला यांनी आपापल्या प्रदेशात उठावाचे नेतृत्व केले.
बहादुरशहा |
राणी लक्ष्मीबाई |
नानासाहेब पेशवे |
उठावाचा शेवट :- उठावातील नेत्यांपैकी कुंवरसिंह, मौलवी अहमदउल्ला आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हे धारातीर्थी पडले. मुघल बादशाहा बहादुरशहा यांना इंग्रजांनी तुरुंगात टाकले. नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरतमहल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तात्या टोपे इंग्रजांच्या हाती सापडले. त्यांना फाशी देण्यात आले.
हा उठाव जवळजवळ वर्षभर चालू होता. भारतीय सैन्य शौर्य, धैर्य , यांत कमी नव्हते. तरीही या उठावात त्यांना अपयश आले. याचे कारण इंग्रजांनी या उठावास अत्यंत योजनाबद्ध रीतीने व खंबीरपणे तोंड दिले. इंग्रजांच्या सैन्यातील शिस्त उत्तम होती. लष्करी हालचालींत एकसूत्रता होती. इंग्रजांकडे दळणवळणाची आधुनिक साधने व शस्त्रे होती.
उठावाचे परिणाम :- १८५७ च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील सत्तेचा शेवट झाला. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला. तिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. भारतीयांच्या रूढी, चालीरीती आणि धर्म यांत इंग्रज हस्तक्षेप करणार नाहीत, तसेच संस्थानिकांची राज्ये खालसा केली जाणार नाहीत, असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले.
कुवरसिंह |
बेगम हजरतमहल |
तात्या टोपे |
Thank you for uploading this information....
ReplyDelete