Thursday, November 29, 2018

नवे विचार : नवी दृष्टी


                   

इंग्रजांच्या राजवटीत पाश्चात्त्य शिक्षणपद्धती भारतात 
सुरू झाली. देशात नवनव्या कल्पना व विचार येऊ लागले.

भारतीय समाजातील जातिभेद, स्त्री-पुरुष विषमता, सतीची चाल, बालविवाह अशा अनिष्ट चालीरीतींमुळे भारतीय समाजाची प्रगती खुंटली  होती. ही स्थिती बदलण्यासाठी आधुनिक शिक्षण घेतलेल्या भारतीय विचारवंतांनी प्रयत्न सुरू केले. त्यातून समाजसुधारणा चळवळीची सुरुवात झाली.

राजा राममोहन रॉय :- भारतातील समाजसुधारणा चळवळीचे राजा राममोहन रॉय हे आद्य प्रवर्तक होते. त्यांनी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन या धर्माचा अभ्यास केला होता. सर्व धर्माची शिकवण सारखीच आहे, असे त्यांचे ठाम मत होते. बालविवाह, सतीची चाल या अनिष्ट रूढींवर त्यांनी प्रखर टीका केली. त्यांच्या प्रयत्नाने इ. स. १८२९ मध्ये ब्रिटिश सरकारने सतीची चाल कायद्याने  बंद केली.

राजा राममोहन रॉय केली
                                                                         
भारतातील शिक्षणपद्धतीत बदल केल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही, असे त्यांना वाटे. त्यांनी पाश्चात्त्य शिक्षणाचा पुरस्कार केला. आपल्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी 'ब्राम्हो समाज' ही संस्था स्थापन केली. समाजाला त्यांनी समानतेचा व बंधुभावाचा संदेश दिला. राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक' असे म्हणतात.

गोपाळ हरी देशमुख :- प्रभाकर' या साप्ताहिकात गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी' या टोपण नावाने लेखन करत. आधुनिक शिक्षणातून समाजसुधारणा घडेल, असा त्यांना विश्वास होता, समाजातील जातिभेद, धर्मभोळेपणा यांवर त्यांनी टीका केली. विधवाविवाहाचा पुरस्कार केला. वाचनालयाची चळवळ त्यांनी महाराष्ट्रभर सुरू केली. आपल्या देशात तयार होणारा मालच वापरावा, असा त्यांचा आग्रह होता.


गोपाळ हरी देशमुख
                                                                                    
                                                   
स्वामी दयानंद सरस्वती : - समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तिपूजा यांना विरोध करणारे स्वामी दयानंद सरस्वती हे थोर विचारवंत होते. बालविवाह, जातिभेद याला, त्यांनी प्रखर विरोध केला, पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना  शिक्षणाचा हक्क आहे, असे त्यांचे मत होते. आपले विचार सामान्य लोकांपर्यंत पोहचावेत म्हणून त्यांनीआर्य  समाज' या संस्थेची स्थापना केली.
स्वामी दयानंद सरस्वती
                                                                                              
महात्मा जोतीराव फुले :- महात्मा फुले यांनी समाजसुधारणांचे विचार मांडले. त्यांनी जातिभेदाला विरोध केला.


महात्मा जोतीराव फुले
                                 
                      
मुलींना व दलितांना शिक्षण घेता यावे म्हणून पुण्यात शाळा काढल्या. सर्व लोकांना आधनिक शिक्षण मिळावे, असा त्यांचा आग्रह होता.  प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली. 'सत्यशोधक समाज' ही संस्था स्थापन करून त्याद्वारे त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ही मूल्ये  रुजवण्याचा प्रयत्न केला. देशाचे ऐक्य व स्वातंत्र्य यांसाठी सामाजिक समता आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्या लिखाणातून महात्मा फुले यांनी शेतक-यांवरील अन्यायाला वाचा फोडली.

सावित्रीबाई फुले :-  सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. समाजाच्या विरोधाला न जुमानता मुलींना शिकवण्याचे कार्य त्यांनी केले. अनाथ बालकांचे संगोपन केले. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचे कार्य चालू ठेवले.
सावित्रीबाई फुले
                                                                                                                                            
सर सय्यद अहमद खान  :- मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी सर सय्यद अहमद खान यांनी मोलाची कामगिरी केली. त्याकाळच्या मुस्लिम समाजात पाश्चात्त्य शिक्षणाचा अभाव होता. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी या शिक्षणाची गरज आहे, हे त्यांनी पटवून दिले. मुस्लिम स्त्रियांनी पाश्चात्त्य शिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी अलीगढ़  येथे शिक्षण संस्था स्थापन केली.

सर सय्यद अहमद खान
                                 

                                  
महादेव गोविंद रानडे :- न्यायमूर्ती रानडे हे समाजसुधारणा चळवळीत अग्रभागी असलेले विचारवंत होते. त्यांनी जातिभेदाला विरोध केला. स्त्रीशिक्षण आणि विधवाविवाहाचा पुरस्कार केला. पाश्चात्त्य शिक्षणाचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी, यासाठी ते सतत झटले. भारतात औद्योगिक प्रगती व्हावी, असा त्यांचा आग्रह होता.

महादेव गोविंद रानडे
                                 

                                                            
स्वामी विवेकानंद :- स्वामी विवेकानंद यांनी सर्व जगाला मानवजातीच्या सेवेचा संदेश दिला. दीन-दुबळ्या लोकांना मदत करणे, मानवाची नि:स्वार्थीपणे सेवा करणे हाच खरा धर्म आहे. अशी त्यांची शिकवण होती. अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट चालीरीती यांवर त्यांनी कडाडून हल्ला केला. जातिभेदाला विरोध केला. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी रामकृष्ण मिशन' या संस्थेची स्थापना केली.

स्वामी विवेकानंद
 
ताराबाई शिंदे :- यांनी स्त्रीपुरुषतुलना' या आपल्या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. अनिष्ट रूढी, परंपरा यांवर टीका केली. स्त्रियांची दु:खे दूर  व्हावीत, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे, असे विचार त्यांनी मांडले.

ताराबाई शिंदे
                                 

                                    
पंडिता रमाबाई :-स्त्रियांची स्थिती सुधारण्याच्या कार्यात पं.रमाबाई  यांनी महत्त्वाचे कार्य केले.बालविवाहास त्यांनी विरोध केला. विधवा विवाहास प्रोत्साहन दिले.विधवांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी शारदा सदन' ही संस्था स्थापना केली.

पंडिता रमाबाई
                                      
                                                     
समाजसुधारणेचे असेच विचार पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, वीरेशलिंगम पंतलू, गोपाळ गणेश आगरकर, नारायण गुरू, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहूमहाराज इत्यादींनी मांडले. आधुनिकता व मानवता या मूल्यांवर ही सुधारणा चळवळ आधारित होती. त्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झाले. यातूनच राष्ट्रीय चळवळीचा उदय झाला.

पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
बंगालमधील थोर समाजसुधारक, स्त्री-शिक्षणाचे ते पुरस्कर्ते होते. विधवाविवाहाची चळवळ सुरू केली.

पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
                                   

                               
 वीरेशलिंगम पंतलू  
मद्रास प्रांतात समाजसुधारणेचे कार्य यांनी केले. आपले सुधारणाविषयक विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांनी हास्य-संजीवनी' हे वृत्तपत्र सुरू केले.

 वीरेशलिंगम पंतलू 
                                                                                           
 गोपाळ गणेश आगरकर
केसरी वृत्तपत्राचे ते पहिले संपादक होते. त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले. 'इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार' अशी त्यांची भूमिका होती.

 गोपाळ गणेश आगरकर
                                      

                                                      
नारायण गुरू
केरळमधील एक थोर समाजसुधारक. अस्पृश्यता, जातिभेद आणि बालविवाह इत्यादी प्रथांना त्यांनी प्रखर विरोध केला.

नारायण गुरू
                                           

                                                                          
महर्षी धोंडो केशव कर्वे
स्त्री-शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते. त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र विदयापीठ स्थापन केले. विधवाविवाहाला प्रोत्साहन दिले.
महर्षी धोंडो केशव कर्वे
                                     

     
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
 दलितांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनीडिप्रेस्ड क्लासेस मिशन'ची स्थापना केली. देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवला.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे



राजर्षी शाहूमहाराज
बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले.वेठबिगारीच्या पद्धतीवर बंदी घातली.
राजर्षी शाहूमहाराज
                                     
                           


इंग्रज राजवटीचे परिणाम



            
इंग्रजांच्या आगमनापूर्वी एक अतिशय संपन्न देश अशी भारताची प्रसिद्धी होती. कापड उद्योग, हस्तकला व्यवसाय व अन्य व्यापारी वस्तूंचे उत्पादन यांत भारतीय आघाडीवर होते. भारताचा व्यापार जगभर  चालत होता, पण इंग्रजांच्या आर्थिक व व्यापारी धोरणांमुळे भारतातील संपत्तीचा ओघ आता इंग्लंडकडे जाऊ लागला. त्यातून भारताची पिळवणूक सुरू झाली.  


 भारतात बहुसंख्य लोक खेड्यांतच राहत. ते शेतीवर उपजीविका करत. त्यांना लागणाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू गावातच तयार होत. भारतीय अर्थव्यवस्थेत स्थानिक कारागीर हा महत्त्वाचा दुवा होता. ही परिस्थिती इंग्रजांच्या राजवटीत बदलली.

कापड उद्योगाचा ऱ्हास :- कापड उद्योग हा सर्वात मोठा उद्योग  होता. भारतात तयार झालेले कापड युरोपात अतिशय लोकप्रिय होते. युरोपात त्याला मोठी मागणी होती.

इंग्लंडमध्ये तयार होणारे कापड भारतात विकले जावे म्हणून इंग्रजांनी भारतीय कापड उद्योगावर जबर कर बसवले. त्यामुळे भारतीय कापड महाग आणि इंग्रजांचे कापड स्वस्त अशी परिस्थिती निर्माण झाली. इंग्रजांच्या अशा धोरणामुळे एकेकाळी भरभराटीला आलेला भारतीय कापड उद्योग डबघाईला आला. कसबी कारागीर व विणकर बेकार झाले.

 इतर उद्योगधंद्यांची पीछेहाट :- इ.स. १८५३ मध्ये इंग्रजांनी भारतात रेल्वेमार्ग सुरू केला. पुढील काळात रेल्वेमार्गाचे जाळे देशभर  पसरले. या सोईमुळे ब्रिटिश माल देशाच्या कोनाकोप-यांत पोहोचू लागला. यंत्रावर तयार झालेल्या परदेशी मालाशी स्थानिक कारागिरांना स्पर्धा करता येणे शक्य नव्हते. परिणामी भारतीय उड्योग, व्यवसाय बुडाले.
शेतकरी दरिद्री बनला :- शेतसारा हे सरकारच्या उत्पन्नाचे मुख्य  साधन  होते. पूर्वी शेतसारा हा धान्याच्या स्वरूपात भरला जात असे. इंग्रजानी  शेतसारा पैशाच्या स्वरूपात भरण्याची सक्ती केली. तो वेळच्या वेळी भरावा लागे. त्यात सूट दिली जात नसे. शेतसारा भरण्यासाठी शेतक-यांकडे रोकड पैसा नसे, म्हणून ते जमिनी गहाण टाकून सावकाराकडून कर्ज घेत. कर्जाची परतफेड करता आली नाही, तर त्यांना जमिनी विकाव्या लागत.  

ज्या पिकांना परदेशात मागणी असेल, तीच पिके शेतक-यांनी काढावीत, इतर पिके काढू नयेत, अशी इंग्रजांनी भारतीय शेतक-यांवर सक्ती केली. त्यामुळे कापूस, तंबाखू, नीळ इत्यादी नगदी पिके शेतक-यांना काढावी लागत. नगदी पिके म्हणजे रोख पैसा मिळवून देणारी पिके. ही पिके इंग्रज व्यापारी त्यांच्याकडून कमी किमतीला विकत घेत आणि जास्त किमतीला विकत. त्यामुळे शेतकरी वर्ग नाडला जाऊ लागला.

इंग्रजांनी केलेल्या सुधारणा :- इंग्रजांनी भारताचे  आर्थिक शोषण केले, पण राज्यकारभाराच्या सोईसाठी त्यांनी काही सुधारणाही अमलात आणल्या. या सुधारणांमुळे भारतीयांना काही अप्रत्यक्ष फायदे झाले.

 भारतात रेल्वेमार्गाचे जाळे पसरले. रेल्वेसारख्या दळणवळणाच्या सोईमुळे भारतीयांचे परस्परांतील संबंध वाढीस लागले.

गाव, तालुका, जिल्हा, प्रांत अशा पातळ्यांवर सरकारी अधिका-यांची नेमणूक करण्यात आली. तलाठी, पोलीस पाटील, कलेक्टर, न्यायाधीश यांसारख्या अधिका-यामुळे प्रशासनाची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण झाली.

 पाश्चात्त्य शिक्षण देणा-या शाळा सुरू झाल्या. त्यामुळे पाश्चात्त्य कल्पना व विचारांचा भारतात प्रसार होऊ लागला. छापखाने आल्यामुळे वर्तमानपत्रे, विविध विषयांवरचे ग्रंथ प्रसिद्ध होऊ लागले. यामुळे भारतीय समाजात वैचारिक जागृती होऊ लागली.

Featured post

क्रांतियुग

समाजजीवनाच्या राजकीय , सामाजिक , धार्मिक , आर्थिक अशा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात , अशा बदलांना क्रांती ...